Pune Ganeshotsav 2022: कोरोनामुळे (corona) आजारामुळे आणि लॉकडाऊनमुळे दोन वर्षांनंतर यंदा पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2022) धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका (पीएमसी), पुणे शहर पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची सोमवारी (8 ऑगस्ट) बैठक होणार आहे.


पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी असल्याने महापालिकेतर्फे दरवर्षी ही बैठक आयोजित केली जाते. दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदाच्या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 12 जुलै रोजी प्राथमिक बैठकही झाली होती. चर्चेनुसार ही बैठक 8 ऑगस्टला होणार आहे.


शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी विविध कामांसाठी परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे थेट पाच वर्षांच्या कालावधीसाठी परवाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मंगळवारी पुण्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. या मागणीचा झाल्यानंतर शिंदे यांनी मंडळांना पाच वर्षांचा परवाना देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. यासोबतच उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर सुरू ठेवण्यासही मान्यता देण्यात आली. या मुद्यांवर अधिक चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे.


दरवर्षी मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘विसर्जन’ मिरवणूक सुरू होते. यंदा मात्र या भागात मेट्रो प्रकल्पाचं काम सुरु आहे. खंडूजीबाबा चौकातील मेट्रो पुलाबाबतही चर्चा होणार असून त्यानुसार या बैठकीत विसर्जन रथांची उंची, कमानी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांसाठी काही निर्णय घेतले आहे. त्या मंडपाचं शुल्क माफ केलं आहे. मंडळाच्या  पदाधिकाऱ्यांना परवानग्यांसाठी फार त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र खिडकीचं नियोजन, ऑनलाईनसुद्धा परवानगी याचा समावेश आहे. त्यामुळे गणेश मंडळांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेण्याचं योग्य नियोजन करा, अशा सुचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत.