PCMC Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad ) दारूच्या नशेत खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका व्यक्तीला काठीने आणि दारूच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. दारूचा ग्लास फेकून खून केला. या वादात बालाजी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी नीलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोघांना अटक केली आहे. 


काय आहे प्रकरण?


मृत बालाजी, नीलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात हे देशी दारुच्या दुकानामागे मद्यपान करत होते. नीलेश आणि बालाजी मद्यपान करत असताना बालाजीने दारूचा ग्लास खाली टाकला. त्या प्रकाराचा नीलेशला राग आला. त्यामुळे नीलेशने बालाजीला काठीने आणि दारूच्या बाटलीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बालाजीचा मृत्यू झाला. 


मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला
बालाजीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आला. मृत बालाजी हा नांदेड येथील रहिवासी असून तो सध्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. 15 जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली नाही. शवविच्छेदन करण्यात आले. डोक्यावर वार करून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.


या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. कचरा डंपरचा चालक राजेंद्र याची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. कंट्री बारमध्ये काम करणाऱ्या अखिल आणि धर्मेंद्र यांनी बालाजीच्या अंगावर कचरा टाकला. त्यामुळे त्याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पिंपरी-चिंवड शहरात गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. कालच पिंपरी-चिंचवडच्या वाकड संकुलात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना वाकड परिसरात मध्यरात्री घडली होती. एका नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या केली होती. रमेश पुजारी असे अटक आरोपीचे नाव होते. ललिता पुजारी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.