पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. पाचव्या स्मृतिदिनी राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ 'अंनिस'चे कार्यकर्ते जमले आहेत. 'मारेकरी सापडला, सूत्रधार कधी?' असा सवाल 'अंनिस'कडून सरकारला विचारण्यात येत आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत अंनिसचे कार्यकर्ते मोर्चा काढत आहेत. गीतांच्या माध्यमातून सुरुवातीला दाभोलकरांना अभिवादन करण्यात आलं. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, मेधा पानसरे यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला पाच वर्षे पूर्ण

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पूलावर डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती.

दोनच दिवसांपूर्वी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. याशिवाय आधीच सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.

सचिन अंदुरेला अटक

नालासोपाऱ्यातील स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. स्फोटक प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना अटक करण्यात आली. यातील शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत.

सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्याला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

सचिन अंदुरे कोण आहे?

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.

“वीरेंद्र तावडेच दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड”

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ज्या दोन मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यातील एक सचिन अंदुरे आहे. हा संपूर्ण कट अगोदरच अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याने रचला आहे. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज सीबीआयने कोर्टात केला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या रिमांडमध्ये संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलंय.

जवाब दो कॅम्पेन

अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्यभरातील विवेकवादी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप डीपी यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सराकरला जाब विचारला जात आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार कधी गजाआड होणार, असा सवाल करत सोशल मीडियावरुन ‘जवाब दो’ कॅम्पेन चालवले जात आहे.