पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेला कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 26 ऑगस्टपर्यंत अंदुरे सीबीआयच्या कोठडीत असेल.


सचिन अंदुरेला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राजकीय दबाव असल्याने अंदुरेला अटक करण्यात आल्याचा दावा अंदुरेचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी केला. तर अंदुरे हा डॉ. दाभोलकरांचा प्रत्यक्ष मारेकरी असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ताब्यात घ्यायचं आहे, असं सीबीआयच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं.

दरम्यान, सचिन अंदुरेची अटक हे तपासाच्या दृष्टीने मोठं पाऊल आहे. मात्र या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढावीत, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

कोर्टात नेमकं काय झालं?

अंदुरेचे वकील – वेळ मारुन नेण्यासाठी अटक

सीबीआयचे वकील – सचिन अंदुरेचं वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण झालं.

अंदुरेचे वकील – आरोप खोटे, सीबीआयकडून फसवणूक

सीबीआयचे वकील – महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बंदुकीचं प्रशिक्षण

अंदुरेचे वकील – अटकेसाठी राजकीय आणि इतर दबाव होता.

सीबीआयचे वकील – अंदुरे प्रत्यक्ष मारेकरी, त्याच्याकडून वाहन, शस्त्र ताब्यात घ्यायचं आहे.

अंदुरेचे वकील – सीबीआयला 20 तारखेची डेडलाईन होती, म्हणून अटक

सीबीआयचे वकील – अंदुरेमागे कोण, त्याला कुणी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं याचा शोध घ्यायचा आहे.

सचिन अंदुरेला अटक

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर प्रकरणाचे धागेदोरे मिळाले होते. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं आहे. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

सचिन अंदुरे कोण आहे?

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण

येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.