स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये: हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 03 May 2016 03:01 PM (IST)
पुणे : पुण्यात 5 लाखांत घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मेपल ग्रुपच्या सचिन अग्रवालला 5 मेपर्यंत अटक करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, सचिन अग्रवालला गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात 3 मे आणि 4 मेला हजेरी लावावी लागणार आहे. तसंच घरासाठी मेपल कंपनीला पैसे देणाऱ्यांची सविस्तर माहिती देण्याचे आदेशही हायकोर्टानं सचिन अग्रवालला दिले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा वापर करून मेपलचा गृह प्रकल्प सरकारी भासवल्याचा आरोप सचिन अग्रवालवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. घराच्या नोंदणीसाठी मेपल कंपनीनं 3 कोटी 74 लाख रुपये गोळा केले असून, त्यापैकी 2 कोटी 90 लाख परत करण्यात आले आहेत, अशी माहिती मॅपलकडून न्यायालयाला देण्यात आली.