पुणे : पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यावरणपूरक गणपती विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढल्याचं उघड झालं आहे.
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं आहे.
उच्च शिक्षण विभाकडून आलेल्या या आदेशाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानंही विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देणारी पत्रं पाठवली.
हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांची 29 ऑगस्टला पुण्यात भेट घेतली. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीनं नारखेडेंना भेटून पर्यावरण पूरक विसर्जन न करण्यासाठी आणि विद्यार्थ्यानी धर्मपरंपरेप्रमाणं होणारं विसर्जन रोखू नये यासाठी विद्यार्थ्यांना आदेश देण्याची मागणी केलीय. त्यानंतर शिक्षण विभागानं हा आदेश काढला आहे.
विद्यार्थ्यांनो, पर्यावरणपूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नका, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे Updated at: 09 Sep 2017 11:09 PM (IST)