पुणे: पुण्यातील चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चाकणजवळील कडाचीवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने (Dogs Attack) लहान मुलाला घेरुन तिच्यावर हल्ला केला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळच असताना कुत्र्यांच्या टोळक्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडुन त्याचे लचके तोडण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही हैदोस घातला कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ


या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकला मुलगा रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. मात्र, कुत्रे समोर दिसताच हा चिमुकला थांबला. प्रथम एक कुत्रा लांबून त्याच्या अंगावर भुंकला तेव्हा या चिमुकल्याने घाबरुन, 'नाही, नाही, नाही' म्हणत कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकल्याकडून फारसा प्रतिकार होणार नाही हे लक्षात आल्यावर एक कुत्रा पुढे सरसावला आणि चिमुकल्याच्या अंगावर झेप घेतली. त्यापाठोपाठ इतर कुत्र्यांनीची या लहान मुलाला घेरले. पहिल्या कुत्र्याने झेप मारल्यानंतर हा चिमुकला जमिनीवर पडला. आजुबाजूला अनेक कुत्रे आल्यानंतर या चिमुकल्याने पुन्हा उठून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कुत्र्यांच्या झुंडीने या चिमुकल्याला पुन्हा जमिनीवर पाडत त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केले. हा सगळा गलका ऐकून जवळच असलेल्या घरातून एक महिला बाहेर आली. तिनेही या कुत्र्यांना  हाकलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतरही काही माणसं त्याठिकाणी आली आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. 


या घटनेनंतर सामान्य नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, हे पाहावे लागेल. अन्यथा भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहील.


VIDEO: कुत्रे चिमुकल्यावर तुटून पडले



आणखी वाचा


कुत्रे पकडण्यासाठी बटरफ्लाय जाळी, आसामचं पथक भंडाऱ्यात


अटक टाळण्यासाठी चक्क पोलिसांवर सराईत गुंडाने सोडले कुत्रे; शेवटी वनविभागाला दिली माहिती