कुत्र्याने चावा घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरातील श्रावणी गारगोठे जखमी झाल्या आहेत. चिंचवड गावात राहणाऱ्या श्रावणीच्या घराबाहेर एक कुत्रा भुंकत होता, त्याला हाकलण्यासाठी त्या बाहेर आल्या आणि कुत्र्याने त्यांच्या हातांना चावा घेतला.
श्रावणीला ज्या भटक्या कुत्र्याने लक्ष्य केलं, त्याच कुत्र्याने इतर पाच जणांना चावा घेतला. तर शहरभरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना आणि लहानग्यांना बाहेर पडणं अवघड केलं आहे.
गेल्या पाच वर्षातील जखमींची संख्या (आर्थिक वर्षानुसार आकडेवारी)
वर्ष जखमी संख्या
- 2013-14 9360
- 2014-15 9795
- 2015-16 10165
- 2016-17 10553
- एप्रिल 2017-डिसेंबर2017 9568
पिंपरी चिंचवड शहरातील भटकी कुत्री रोज किमान 35 व्यक्तींना जखमी करतात. जखमींचा हा चढता आलेख रोखण्यासाठी महापालिका एका कुत्र्यामागे 650 रुपये असे वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्ची घालते. मात्र महापालिका प्रशासन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. या सर्वाला वाढत्या हॉटेल संख्येकडे बोट दाखवण्यात महापालिका धन्यता मानत आहे.
भटक्या कुत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरात अक्षरशः दहशत माजवली असताना, महापालिका प्रशासन केवळ जखमींची आकडेवारी नोंदवत आहे. महापालिकेने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही.