पुणे : महाविकासआघाडीची सत्ता स्थापन करण्यात शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोलाची भूमिका बजावली. त्याच संजय राऊतांना महाविकासआघाडी तोडायची आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केलाय. पुण्याच्या शिरूर लोकसभेतील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा विकोपाला गेलेला वाद महाविकासआघाडी तोडण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचलाय. एकीकडे राऊतांनी हे ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचं सरकार असं म्हटलंय तर पलटवार करताना सध्या राज्य उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळं चालत असल्याचं म्हणत खेड आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी वादाला आणखी फोडणी दिली. 


शिरूर लोकसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाचे अनेक अद्याय आहेत.


अध्याय पहिला 
निमित्त खेड पंचायत समितीच्या सभापती निवड. राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी आघाडी धर्म विसरत एकमेकांवर शेलक्या शब्दात शेरेबाजी केली. तेव्हा देखील खासदार संजय राऊतांनी खेडमध्ये येऊन आमदार मोहितेंना सुनावलं होतं.


अध्याय दुसरा - 
निमित्त पुणे-नाशिक महामार्गावरील उद्घाटन सोहळे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव. आढळरावांनी एक दिवस आधीच उद्घाटन सोहळा उरकला, तेव्हा खासदार कोल्हे यांनी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे हात डोक्यावर असल्याने मुख्यमंत्री आहेत. असं वक्तव्य केलं होतं.


अध्याय तिसरा - 
निमित्त जुन्नर तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन. कार्यक्रमाच्या मंचावरून शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंच सोडला. राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके आणि शिवसेना नेते शरद सोनवणे या वादाची याला किनार होती.


अद्याय चौथा - 
खेड पंचायती समिती राष्ट्रवादीच्या सभापतीची निवड. यावेळी पुन्हा खासदार संजय राऊतांनी शरद पवारांना मानतो पण त्यांचे आमदार मोहितेंचा पराभव करून राहणार असं आव्हान दिलं. मग आमदार मोहितेंनी थेट महाविकासआघाडी तोडायची का? असा सवाल राऊतांना केला.


या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिरूर लोकसभेत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत हा वाढता वाद मिटविण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेला आवाहन केलं. पण शिवसेनेच्या नेत्यांना हे काही मान्य नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशीच सामना करायचा आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पहायला मिळते. अशात राज्यात अभूतपूर्व महाविकासआघाडी झालीये. वरवर सर्व तिन्ही पक्षाचे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचं दाखवीत आहेत. प्रत्यक्षात मतदारसंघात मात्र शिरूर लोकसभेप्रमाणेच वाद उफळण्याची दाट शक्यता आहे. हे वाद शमले नाही तर महाविकासआघाडीत बिघाडी अटळ आहे.


महाराष्ट्रात आज एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय : शरद पवार
स्वर्गीय बाणखेले यांच्यासोबत केलेलं काम कधीच विसरता न येणार आहे. तामिळनाडूतील राजकारणी एकमेकांचं अनादर केलेलं पहायला मिळतं. महाराष्ट्रात सत्तेत असो वा नसो, इथं एकमेकांचं आदर केला जातो. महाराष्ट्रातील राजकारणात संघर्ष होतो. पण त्या मर्यादा राखून असतात. दुर्दैवाने आज संघर्ष दिसतोय. महाराष्ट्रात आज एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत. दिलगिरीही व्यक्त करण्याची वेळ येते. ही आजची महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते. ( राज्यातील नेत्यांचे कान टोचले)