पुणे: डिपॉझिट न भरल्यामुळे गरोदर महिलेवर उपचारास नकार देणाऱ्या आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असणाऱ्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबतचा अहवाल समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या अहवालाबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानुसार संबंधित घटनेसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला (Dinatha Mangeshkar hospital) दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या, असेही म्हटले आहे. यानंतर भाजपचे आमदार अमित गोरखे हे आक्रमक झाले आहेत.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असं डॉ. राधाकिशन पवारांनी आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास आणि टीमवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी आक्रमक भूमिका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या राज्यसभा खासदार आणि पुण्यातील नेत्या मेधा कुलकर्णी मात्र एकप्रकारे दिनानाथ रुग्णालयाचा बचाव करताना दिसल्या होत्या. भाजपच्या महिला आघाडीने घैसास यांच्या रूग्णालयात जाऊन तोडफोड केली. त्याचा निषेध मेधा कुलकर्णी यांनी केला. अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला सोम्या-गोम्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही, असे मेधा कुलकर्णी म्हटले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल, असे मला वाटते. प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यांनी टाळला पाहिजे, असे मेधा कुलकर्णी यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
सरकारी समितीच्या अहवालात काय म्हटलंय?
सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने रुग्णाची रुग्णालयात एन्ट्री आहे. रुग्णाला 2 तारखेला बोलवलं होतं. पण २८ तारखेला रक्तस्त्राव होऊ लागल्याने रुग्ण त्याच दिवशी त्यांचा डॉक्टरांशी संपर्क झाला. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला रुग्णालयात बोलावलं. तसंच संबंधीत स्टाफला सूचना दिल्या. डिलिव्हरीसाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे डिलिव्हरीची ऑपरेशनची तयारी करण्यात आली. त्याच दिवशी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी १० लाखांची मागणी केली. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तीन लाख रुपये आहे, ते तीन लाख आता घ्या, इतर पैशांची व्यवस्था आम्ही दोन ते चार तासांत किंवा उद्यापर्यंत करू. या काळात संबंधित विभागाला मंत्रालयातून, अनेक विभागातून फोन गेले. पण रुग्णालयाने याची कोणतीही दखल घेतली नाही.'
डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना तुमच्याकडे कोणतं औषध असेल, तर ते द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करा असं सागितले. पण रुग्णालयाने कोणतेही उपचार केले नाहीत. सहकार्य केलं नाही. याकाळात रुग्णाची मानसिकता खचून गेली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे रुग्णाची मनाची स्थिती हळवी झाली होती, असे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
आणखी वाचा