पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला, त्यानंतर आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात येत आहे. दरम्यान भिसे कुटुंबीयांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेतली आणि त्यांनी एक लेखी पत्र देखील दिलं आहे. हे पत्र एबीपी माझाच्या हाती आलं आहे.
भिसे कुटुंबीयांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना दिलेल्या पत्रामध्ये आमची खासगी माहिती जगजाहीर केल्याचा आरोप रुग्णालयावर केला आहे. कुटुंबीयांची रुगणालय प्रशासनाने बदनामी केली असा आरोप भिसे यांनी केला आहे. डॉ घैसास यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील भिसे कुटुंबीयांनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणून बुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केली. रुग्णालयाने खाजगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी देखील भिसे कुटुंबीयांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. चाकणकर यांनी भिसे कुटुंबीयांचे पत्र स्वीकारलं असून सविस्तर माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असे, आश्वासन भिसे कुटुंबाना दिले आहे.
भिसे कुटुंबीयांनी देलेल्या पत्रात काय लिहलंय?
डॉक्टर घैसासच्या माध्यमातून आमच्या बहिणीचे गेलेले प्राण याबाबत तुम्ही सर्व जाणताच, परंतु त्यानंतर अंतर्गत समितीच्या अहवाल जगजाहीर करून दिनानाथ मंगेशकरच्या कमिटी मेंबरवर आणि त्या चार सदस्यांवर आमची व तनिषाची मृत्यूनंतर केलेली बदनामी मानसिक छळ करणारे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केलेला हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचला असून, आयव्हीएफ बाबतची माहिती ही आमची खाजगी बाब आहे. ताई तुम्ही डॉक्टर घैसासवरती मनुष्यवधाचा आणि या कमिटीने आमची माहिती जगजाहीर केल्याबद्दल कमिटीच्या लोकांवर कारवाई करावी, ही नम्र विनंती. आम्ही घरातील सर्वजण ही मागणी करत आहोत, असं पत्र भिसे कुटुंबीयांनी चाकणकरांना दिलं आहे.
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?
रुपाली चाकणकर म्हणाल्या, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा ही मूलभूत अशी गरज आहे, नागरिकांना धर्मादाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देण अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना रुग्णाला त्यांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते, पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये रुग्णाच्या बऱ्याच गोपनीय गोष्टी जाहीर केल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. रुग्णालयाला मी कडक समज देते, असं चाकणकर म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दाखल घेतली असून आरोग्य विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे, आरोग्य उपसंचालक व पोलिस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत संबंधित राज्याच्या वतीनेची समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल यावेळी सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवला आहे, त्यात जबाबावर देखील चर्चा केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.