बारामती, पुणे बारामतीत (Baramati) सुरू असलेले चंद्रकांत वाघमोडे यांनी उपोषण मागे घेतलं आहे.  धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलं होतं. तेराव्या दिवशी चंद्रकांत वाघमोडे (Chandrakant Waghmode) यांनी उपोषण मागे घेतलं आहे.मंत्री अतुल सावे यांचा निरोप घेऊन प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खंडेराव कोकरे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं. बारामतीतील प्रशासकीय भावनाबाहेर उपोषण सुरू होते. गेली तेरा दिवसांपासून आरक्षणाकडे सरकारने पाठ फिरवल्याने आंदोलन आक्रमक झाले होते. राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी एक कमिटी गठीत करून या कमिटीचा अहवाल आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी केले. आज चंद्रकांत वाघमोडे यांना मंत्री गिरीश महाजन यांनी लेखी पत्र दिले आहे. उपोषणकर्ते वाघमोडे आणि माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. 


उपोषण सोडताना वाघमोडे काय म्हणाले?


उपोषण सोडताना वाघमोडे म्हणाले की, चार राज्याच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत धनगर समाजातील नऊ जणांचा समावेश आहे. या समितीत 9 जणांच्या समावेश करण्यासाठी हे उपोषण नसून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं, यासाठी हे उपोषण होतं. माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांशी बैठकीचं नियोजन करुन देण्याची मागणी केली. सावेंनी ही मागणी मंजूर केली त्यामुळे आज उपोषण मागे घेतलं असल्याचं चंद्रकांत वाघमोडे यांनी उपोषण सोडताना सांगितलं आहे. 


सरकारचं लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न 


या उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न वाघमोडे यांनी केला होता. राज्यातील सगळ्या आमदार आणि खासदार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी धनगर समाजाच्या नागरिकांना दिला होता. त्यानुसार बारामतीतील अजित पवारांच्या घराबाहेर धनगर समाजाने आंदोलन केलं होतं. सोबतच काही ठिकाणी रास्तारोको करत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. 
 


अनेकांनी घेतली वाघमोडेंची भेट


धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसलेले होते. बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर चंद्रकांत वाघमोडे यांचं उपोषण सुरू होतं. यापूर्वी पुण्याचे  जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली होती. उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे येत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतला होता.सरकारने 50 दिवसात काय केलं?, हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे शासनाचे प्रतिनिधी याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. याचे उत्तर हे मुख्यमंत्री देऊ शकतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी इथे यावं किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांना पाठवावं, अशी मागणी उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी केली होती.  


इतर महत्वाची बातमी-


Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; येरवडा कारागृह प्रशासनाकडून ललित पाटीलला मदत, Exclusive पत्र एबीपी माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय?