पुणे : शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील हायप्रोफाईल कार दुर्घटनेमुळे (Accident) समाजमन हादरुन गेलंय. गर्भश्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन जणांचा जीव घेतला. विशेष म्हणजे हा कारचालक मुलगा अल्पवयीन असल्याने न्यालायानेही त्यास तत्काळ जामीन मंजूर केला. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का, गरिबाच्या मुलांना काही किंमत नाही का, बड्या उद्योगपतींना कायद्याची भीती नाही का, पोलीस प्रशासन (Police) बड्या उद्योगपतींसाठी एवढं मवाळ का, असे अनेक प्रश्न या अपघाताच्या घटनेनंतर विचारले जात आहेत. त्यानंतर, राज्य सरकारही याप्रकरणी गंभीर झाले असून गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पुण्यात पोहोचले आहेत. फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन पोलिसांसोबत बैठक घेतली. त्यामुळे, पुण्यातील घटनेवर गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. 


पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी कारचालक वेंदात अग्रवाल यास पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर, त्यास पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपी कारचालकास पिझ्झा व बर्गर आणून दिल्याचंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्यामुळे, या घटनेनवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील तरुणाई एकत्र येत अपघाताच्या घटनेचा आणि पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवत आहे. समाजातील विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकार गंभीर झालं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन संवाद साधला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही दबाव न झुगारता कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणी राजकीय दबाव न झुगारता कारवाई करा, असे निर्देशच पुणे पोलिसांना दिले आहेत. 


एकीकडे पोलिसांवर प्रश्नचिन्ह आणि दुसरीकडे राजकीय दबावाचा आरोप होत असल्याने, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शनमोडमध्ये दिसत आहेत. कारण या प्रकरणात कायद्याने शक्य ती सर्व कारवाईचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी कालच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन, अधिक माहिती घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे पुणे पोलिसांची धावाधाव पाहायला मिळत आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपीचे वडील आणि उद्योगपती विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली असून, आज त्याला पुणे पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात येणार आहे. 



न्यायालयाच्या अटी व शर्तींवर सोशल मीडियातून तीव्र संताप


पुणे अपघात प्रकरणात न्यायालयाने 17 वर्षीय आरोपी वेंदात अग्रवाल यास तत्काळ जामीन मंजूर केला. मात्र, या जामीनासोबतच काही अटी व शर्तीही घालून दिल्या आहेत. त्यामध्ये, वेंदात यास 15 दिवस वाहतूक पोलिसांसमवेत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. तसेच, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही घ्यावे लागणार आहेत. या शिवाय अपघाता संबंधी निंबधलेखनही करण्यात न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरुन समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यानंतर राज्य सरकारही गंभीर झाले आहे. 


उत्पादन शुल्क विभाग बारमध्ये पोहोचला


कोझी अॅड ब्लॅक पबमध्ये विशाल अग्रवाल यांचा मुलगा गेला होता. याच बारमध्ये त्याला दारू सर्व्ह करण्यात आली होती. पोलिसांच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज याच बारमधील आहेत. आता, या बारमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात हा बार आहे. सतरा वर्षाच्या मुलाला या बार मध्ये एन्ट्री कशी दिली?, बारमध्ये आयडी चेक केले नव्हते का?, असे प्रश्न उपस्थित केले जात असून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत.