पुणे: मुंबईत काल(गुरूवारी) आझाद मैदानावरती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील रुग्णाला पाच लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली. येरवडा येथील रहिवासी चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे (वय 59) असे या रुग्णाचं नाव असून, त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavisयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या फाइलवर केली. या पहिल्या सहीमुळे पुण्यातील रुग्णाला पाच लाख रुपयांची मदत झाली आहे. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर सही करताना दिले. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्स्प्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसाह्य देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री झाल्यावर पहिली सही कुऱ्हाडे यांच्या फाईलवर केली आणि त्यांना मदत दिली. यामुळे चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांना काही दिवसांपूर्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी या निधीची मागणी केली होती. त्यांच्या या सर्जरीसाठी किमान 30 लाखांचा खर्च होता. सगळीकडे मदत मागून देखील कोणतीही मदत मिळाली नाही. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यातून लगेच पाच लाखांची मदत मिळाली त्यामुळे आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे चंद्रकांत यांचा मुलगा यश कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना कुऱ्हाडे चंद्रकांत यांचा मुलगा यश कुऱ्हाडे म्हणाला, माझ्या वडिलांचे नाव चंद्रकांत कुऱ्हाडे आहे, यांना ऑगस्ट महिन्यात हा आजार झाला असून त्यांना डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचे सांगितलं होतं. त्यासाठीचा खर्च 30 लाख रुपये इतका होता. आम्ही बऱ्याच ट्रस्टमध्ये गेलो पण तरीपण काही मदत झाली नाही. पण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता. तर आठवड्यातच त्याचा निकाल लागला आणि आम्हाला पाच लाख रुपये मिळाले. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभारी आहोत असं चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या मुलाने म्हटलं आहे.
तर स्वतः चंद्रकांत कुऱ्हाडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.