पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी होईल, असं म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिला होता. तो शब्द फिरवलाय का अशा चर्चा सुरु असल्याचा प्रश्न विचारला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, मी कर्जमाफी बाबत सविस्तर मी सांगितले आहे, कर्जमाफी कधी करायचे यासंदर्भात त्याचे काही नियम आहेत. कर्जमाफीची एक पद्धत आहे, या सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवत नाही, उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल.
देवेंद्र फडणवीस यांनी योग जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचं म्हटलं. आज अनेक ठिकाणी योग होत आहे. पुण्यात आज योग करण्यात आला, पुण्यात आज वारी आहेत,वारकरी बंधू सोबत योग करण्यात आला, एकाच वेळी 700 ठिकाणी योग करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्याच्या भवानीपेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामादरम्यान आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून माध्यमांना चुकीची वागणूक मिळाली, यासंदर्भात विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या वारीचं आणि पालखीचं तत्व आनंददायी आहे.आनंदाची पालखी आहे,आनंदवारी आहे, अशा प्रकारचं काही घडलं असेल तर भविष्यात घडू नये यासाठी आम्ही बोलू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्ही पण मनावर घेऊ नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
कुठल्याही परस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही, त्याबाबतच्या आरक्षण उठवण्यात सांगितले आहे,आळंदी मध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यातील धरणातील पाण्याबाबत आणि पावसाच्या पाण्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. कधी पाण्याचा विसर्ग करायचा कधी कमी करायचा, बाजूच्या राज्यांमध्ये आमचे बोलणे सुरू आहे.योग्य बोलणं सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदन पहिल्या सहाशे मध्ये आपले विद्यापीठ आले आहे. सर्व मान्यता दिलेल्या आहेत पुढच्या काही दिवसात विद्यापीठ भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.