पुणे : पोलिस स्टेशनमध्ये काम करताना कोणताही भेदभाव करू नका, सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाच्या चुकला तर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांचा वचक असला पाहिजे, गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना कानपिचक्या दिल्या. उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. पोलिस दलात 50 टक्के ऐवजी 100 टक्के नोकर भरती करणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर कॅबिनेटची मिळणार मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, पुण्यात अलीकडे गुन्हेगारीच्या घटना घडल्या, कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं. ससूनमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगणाऱ नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आलं आणि कोणी काही चुकलं तर देवेंद्रजी सस्पेंड करत नाहीत तर बडतर्फ करतात.
पोलिसांचा वचक असला पाहिजे
त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे, चित्रपटांचा परिणाम जाणवत आहे. पुष्पा नाम है मेरा, फुल नही फायर हुं, काय चाललंय? जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे बाहेर वाढदिवस साजरे होतात. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे. गुन्हेगारांचे होर्डिंग लागतात कसे? पोलिसिंगची पद्धत बदलली पाहिजे. पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिलं पाहिजे. पोलिस दलातील भरतीचे निकष बदलण्याची गरज आहे, उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. पोलिसांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे, एक महिला पोलिस शरीराने अगदीच किरकोळ असल्याचं निदर्शनास आलं. चोराला कसं पकडणार असं तिला विचारलं तर ब्रेकिंग न्यूज झाली, असेही अजित पवार म्हणाले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता
पुण्यालगतच्या हायवेवरील वाहतूक कमी करण्यासाठी रिंग रोड करणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एप्रिलअखेर लोकसभा निवडणुका होतील, असाही अंदाज त्यांनी वर्तवला. साखर कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे, कारखान्यात राजकारण आणू नये, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही,थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखाण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या