पुणे : पुणे शहरात डेंग्यूने डोकं वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्या ठिकाणी डेंग्यूच्या अळया सापडत आहे, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील 12 पोलिस ठाण्यांच्या आवारातील पाण्याच्या डबक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. या पोलिस ठाण्यांना आरोग्य विभागाने नोटीस पाठवल्या आहेत.


पुणे शहरात स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया आणि डेंग्यू या आजारांनी डोकं वर काढले असून त्यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

8 हजार 270 खासगी तर 3 हजार 71 सार्वजनिक इमारतींमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यापैकी 5 हजार जागांवर औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच 67 सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 हजार मिळकतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. या मोहिमेसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.