Ranveer Singh Police Complaint In Pune : अभिनेता रणवीर सिंह याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आहे. पुणे शहराचे मनसे शारीरिक सेनेचे अध्यक्ष निलेश काळे यांच्याकडून रणवीर सिंह त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भात निलेश काळे यांनी पोलीस आयुक्तालयात निवेदन दिलं आहे.


अभिनेता रणवीर सिंह याचे हे कृत्य समाजमान्य नाही सोशल मीडियावर अशाप्रकारचे न्यूड फोटो अपलोड करून हिंदू संस्कृतीचा अपमान होत आहे. त्याचबरोबर स्त्रियांनाही हा फोटो बघताना लाज वाटत असेल त्यामुळे असं कृत्य त्याने करू नये. तो एक उत्तम अभिनेता आहे. सगळ्यांच्या आवडीचा आहे. तरीदेखील त्यांना समाजाचे भान राखायला हवं. हिंदू संस्कृती जपायला हवी. सोशल मीडिया हे माध्यम प्रसिद्ध होण्याचे माध्यम आहे त्यातून अनेक गोष्टी शिकता पण येतात मात्र त्यावर असे न्यूड फोटो अपलोड करून लहान मुलांवर वाईट संस्कार होण्याची भीती आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी किंवा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निलेश काळे यांनी केली आहे. रणवीर सिंहसारखं हे कृत्य इतर अभिनेतेही करतील आणि तेही प्रसिद्ध होतील त्यामुळे या अभिनेत्याला चाप बसला पाहिजे, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.


पेपर या मॅगझीनसाठी अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटो शुट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशुट चांगलंच महागात पडणार असल्याचं चित्र आहे. रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोसेशन करणारा अभिनेता रणवीर सिंह विरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या न्यूड फोटोसेशनविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यानं तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.