Pune Pmc News: कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात पुणे (Pune) शहरातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक लोकांनी पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक पक्षांनी खड्ड्यांविरोधात (Potholes) आंदोलनही केले. लोकांच्या टीकेनंतर पुणे महापालिकेने (पीएमसी) कारवाई सुरू केली आहे.गेल्या तीन वर्षांत शहरातील 120 रस्त्यांची कामे करणाऱ्या 11 कंत्राटदारांना खड्डे दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ चौघांनीच रस्ते दुरुस्तीची तयारी दर्शवली असून उर्वरित सात जणांनी आतापर्यंत प्रतिसाद दिलेला नाही. कंत्राटदारांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्यास नकार दिल्यास त्यांना दुरुस्तीच्या खर्चाबरोबरच निकृष्ट कामासाठी दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
“पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागालाही खड्ड्यांसाठी जबाबदार धरण्यात आले असून, त्यांनी वाहिन्या टाकल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी दर्जेदार रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. त्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.”, असं डॉ.खेमनार यांनी स्पष्ट केलं आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विकासकामांचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या इंजिनिअर इंडिया लिमिटेड या संस्थेला पावसाळ्यापूर्वीची आणि गेल्या तीन वर्षांत नव्याने पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि वॉर्ड अधिकारीही अडचणीत आले आहेत
रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी पीएमसीच्या रस्ते विभागाला जबाबदार धरण्याबरोबरच, झोन कार्यालयांनाही त्यांच्या प्रभाग हद्दीतील खराब झालेल्या रस्त्यांचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना दिलेली मुदत संपली असून त्यांच्या अहवालानुसार या कामांचीही पाहणी केली जाणार आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
यावर्षी पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे अनेक परिसरात खड्ड्ये पडले होते. पावसाचं पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे अनेक अपघात देखील झाले. नागरिकांनी सतत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या सततच्या तक्रारींनंतर पालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे.