Daund Murder case:  दौंडमधील बीएसएनएल ऑफिसमध्ये सुरक्षकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज मध्यरात्री घडली. प्रकाश सुखेजा असं 60 वर्षीय खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. दौंड शहरातील बीएसएनएलच्या ऑफिसमध्ये प्रकाश सुखेजा मध्यरात्री हे गस्त घालत होते. त्यावेळी मध्यरात्री 2 च्या दरम्यान काही अज्ञात इसम त्यांना बीएसएनएलच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. 


सुखेजा हे चोरट्यांच्या जवळ गेले असता त्यांच्या हातात ऑफिस मधून चोरलेल्या तांब्याच्या तारा होत्या. तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या चोरट्यांना प्रकाश सुखेजानी विरोध केला तेव्हा सुखेजा आणि चोरट्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात चोरट्यांविरोधात सुखेजा यांच्या मुलाने मनोज सुखेजाने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून दौंड पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.


घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दौंडमधील बीएसएनएल ऑफिसमध्ये सुरक्षकाचा  खून झाल्याने ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. या सगळ्या प्रकरणात निष्पाप सुरक्षकाचा  बळी गेल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सुरक्षारक्षकांना रात्रीचा गस्त घालण्यास भीती वाटण्याती शिक्यता आहे.


यापुर्वी लोणी काळभोर परिसरातून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सापडलेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले होतं. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपासात तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले होते. वैशाली लाडप्पा दुधवाले असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील होती. सध्या ती भीमा कोरेगाव येथे राहत होती. तिचा प्रियकर महेश पंडित चौघुले याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. वैशाली केअर टेकर म्हणून काम करत होती. दोघेही एकाच गावातील होते. पाच महिन्यांपूर्वी ते प्रेमात पडले होते.