पुणे : पुण्यात बिबट्यांच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सापाला मारण्यासाठी शेतातील उसाला लावलेल्या आगीमुळं ही घटना घडली. आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावात ऊसतोडणी सुरू होती. यावेळी शेतकऱ्यांना अचानक साप दिसला. त्यामुळे ज्या दिशेने साप गेला, त्याबाजूचा ऊस पेटवण्यात आला. याच आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा मृत्यू झाला. साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वीच त्यांचा जन्म झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

VIDEO | आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू | पुणे | एबीपी माझा



उसात घुसलेला साप पाहून ऊसतोड कामगार भीतीपोटी सापाला मारायला गेले, मात्र यामध्ये पाच बछड्यांचा जीव गेला आहे. उसाच्या शेतीत बिबट्यांचे बछडे आढळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. पण याआधी बछडे जीवंत सापडले आणि त्या बछड्यांची आईशी भेट ही घडवण्यात आली होती.

वनविभाग आणि जुन्नर बिबट निवारा केंद्र ही कामगिरी पार पाडायचे. मादी बिबट्याला जर तिची पिल्लं सापडली नाही तर ती हल्ले करण्याची दाट शक्यता असते. आता हे बछडे तिच्या आईला सोडून गेले आहेत. तेव्हा तिची आई बछड्यांच्या शोधात हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.