पुणे : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करु नये, काळजी करायची असेल तर शेतकरी, बेरोजगारांची करा', असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना लगावला आहे. वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबामध्ये गृहकलह सुरु असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. .

वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत," असं मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना 'मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करु नये, काळजी करायची असेल तर शेतकरी, बेरोजगारांची करा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील पक्षात काय चालु आहे ते तुम्ही काळजी करायची गरज नाही', असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

मोदींनी त्यांच्या भाषणात अजित पवारांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला होता. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "माझ्याकडून एकदा चुक झाली तेव्हा मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. पुन्हा तशी चुक होऊ दिली नाही. पण् आताचे राज्यकर्ते शेतकर्यांना लावारीस म्हणतायत. हनुमानाची जात काढतायत. शेतकऱ्यांना साले म्हणतायत. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे".