पुणे: दौंड तालुक्यातील आलेगावमध्ये असलेल्या दौंड शुगर प्रा. लिमिटेड (Daund Sugar Private Limited) या साखर कारखान्यात दोन कामगार मजुरांचा गरम पाणी भाजून मृत्यू झाला आहे. गणेश सिताराम शिंदे आणि संदीप कुंडलिक गरदडे अशी या मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या आसपास हे दोघे कामगार कारखान्यात उसाचा रस तयार होते, वाफ तयार होते त्याठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होते. संदीप गरदडे हा पाणी मारण्याचे काम करीत असताना पाय घसरून खाली असलेल्या गरम पाण्यात पडला. तर आपला सहकारी मित्र पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश शिंदे याचाही त्याला वाचवताना मृत्यू झाला. 


गरम पाणी भाजून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान दौंड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


अजित पवारांच्या मालकीचा कारखाना


दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खासगी मालकीचा आहे. या कारखान्याच्या मोळीपूजनाच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी येऊ नये अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यावेळी हा कारखाना चर्चेत आला होता. नंतर या कारखान्याचे मोळीपूजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 


माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमावेळी झाला होता विरोध


नोव्हेंबर महिन्यामध्ये जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. त्यावेळी राज्यभरात ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला होता. त्यानंतर अजित पवारांनी मोळी पूजनाला यायचं टाळलं होतं. त्यानंतर दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा घेतली होती. मराठा क्रांती मोर्चाने तशा आशयाचे पत्र पोलीस प्रशासनाला दिलं होतं. 


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालतो. पण दौंडमध्ये अजित पवारांच्या खाजगी मालकीचा कारखाना आहे. त्या कारखान्यावरती देखील मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांना येण्यास विरोध केला होता. 


ही बातमी वाचा: