पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाने (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर शरद पवार गटावर (Sharad Pawar) आरोप केल्यानंतर आज राष्ट्र्वादी काँग्रेसच्या शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) मैदानात उतरला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीदेखील जोरदार पलटवार करताना गौप्यस्फोट केला. भाजपसोबत जाण्यासाठी हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) हे माझ्या घरी पाच तास बसून होते, असे देशमुख यांनी म्हटले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार गटाने केलेले दावे धुडकावून लावले. काही गोष्टी मलाच पहिल्यांदाच समजल्या असल्याचे पवार यांनी म्हटले.
अनिल देशमुख यांनी काय म्हटले?
या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशमुख यांनी म्हटले की, ज्या भारतीय जनता पक्षाने मला खोट्या प्रकरणात मला फसवलं, त्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्यासोबत जाण्यासाठी हवं ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. ज्यांनी मला फसवलं त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. मी भाजपसोबत यावं यासाठी माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. मात्र, मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे अजित पवार यांना सांगितले असल्याचे देशमुख यांनी म्हटले.
पवारांचा वार...
पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. भाजपबरोबर जायला नको ही स्पष्ट भूमिका होती. मला आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही. माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे. लोकांच्या समोर जायचं असेल तर लोक जी भूमिका घेतील ती मान्य करावी लागेल. काहीही स्टेटमेंट केलं त्याचा स्वीकार मी का करायचा? त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, फक्त त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितलं. त्याच्याशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली असल्याचे पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांच्या पुस्तकाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी म्हटले. लोक पक्ष सोडून का जातात, ईडीने कारवाई का केली, घर का जप्त केले याची माहिती वाचण्यास आवडेल असेही पवार यांनी म्हटले.