Daund Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील भांडगाव इथे ट्रक आणि बसचा अपघात (Accident) झाला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा (Police) दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  पोलीस नाईक नितीन दिलीप शिंदे (वय 36 वर्षे) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस नाईक नितीन शिंदे हे हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) कार्यरत होते. सहकाऱ्या अपघातात गमावल्याने पोलीस स्टेशनमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


बसची ट्रकला पाठीमागून धडक, चौघांचा मृत्यू


नितीन शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे निघाले होते. शिंदे प्रवास करत असलेल्या खाजगी बसचा टायर फुटून ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, शिंदेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वीसपेक्षा अधिक जखमी झाले आहेत. संबंधित यंत्रणेने अपघात स्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.


कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने शोककळा


पोलीस नाईक नितीन शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि संस्कृती व गिरीजा या मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


काय आहे नेमकी घटना?


पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील भांडगाव इथे आज (1 फेब्रुवारी) पहाटे पाचच्या सुमारास खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीस हून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघाली होती. बसचा अचानक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोठ्या ट्रकला ही बस जाऊन ही बस धडकली. या अपघातात बसच्या एक बाजूचा चक्काचूर झाला. अपघातात जखमींना नजीकच्या केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये तसेच पुण्याला हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समजतं. अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उपचार दरम्यान दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. बसमधून 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 


संबंधित बातमी