Pune Bypoll election: पुण्यात कसबा (kasba by election) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad By-Election) मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन भाजपने सर्वपक्षीयांना केलं आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे. हीच पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंंती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच पुणे शहरातील सर्व पक्षांच्या अध्याक्षांना पत्र देण्यात आलं आहे. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अनन्यसाधारण स्थान आहे. राज्यात विकासकामात राजकारण केलं जात नाही. सर्व पक्षांचे संबंध चांगले आहेत. यापूर्वीची पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी पाहता लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्या जागेवर निवडणूक बिनविरोध होते. हीच परंपरा कायम राखून कसबा मतदारसंघाची निवडणूक देखील बिनविरोध करावी, असं त्या पत्रात नमूद केलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करणे हिच मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली आहे, असंही त्या पत्रात लिहिलं आहे. 


पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु


चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पत्राद्वारे सर्वपक्षीय नेत्यांना केली आहे. त्यांच्यानंतर आता कसबा मतदारसंघातही बिनविरोध करण्यासाठी मोठ्या हालचाली केल्या जात आहे. त्यानुसार भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (31 जानेवारी) सुरु झाली. पहिल्याच दिवशी कसबा निधानसभेत 16 उमेदवारांनी 27 अर्ज नेले आहेत. मात्र अजून कोणीही अर्ज भरला नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 


कसबा मतदारसंघात आचारसंहिता लागू


दोन्ही मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या 26 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने कसबा मतदारसंघात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. या मतदारसंघासाठी समर्थ पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.