पुणे : मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati Temple) बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे.
पुण्यात गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक मानाच्या गणपतीच्या सजावटीला किंवा देखावा उभारण्याची सुरुवात झाली आहे. यंदा गणेशोत्सवात काय वेगळं करता येईल, याचा विचार सर्वच गणेश मंडळ करताना दिसत आहे. गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासारखी असते. एका रांगेत मानाचे सगळे गणपती ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीत सामील होतात. मात्र पुणेकरांचा ला़डका बाप्पा दगडूशेठ गणपती मिरवणुकीत सामील होण्यासाठी फार उशीर होतो. त्यामुळे पुणेकरांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी वाट बघावी लागते. त्यामुळे यंदा दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. पुढील वर्षी सन 2024मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे.
कशी असेल प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती?
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये 24 खांब आणि 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत. मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक