पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वाहनं तोडफोडीनंतर आता वाहनं पेटवण्याची घटना समोर आलेली आहे. पिंपरीमध्ये तब्बल 10 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुचाकींना लावण्यात आलेल्या आगीमुळे काही काळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पैशाच्या वादातून ही वाहनं पेटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


वाहनं जाळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पैशाच्या देवण-घेवाणीवरुन वाद झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राची गाडी पेटवली. मात्र आगीनं रौद्र रुप धारण केल्यामुळं आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये एकूण 10 गाड्यांचं नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका पोलिसांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहनं तोडफोडीच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.



दोन मित्रांमधील वादातून पिंपरी चिंचवडमधील वाहनांचं जळीतकांड घडून आलं. तीन मित्रांनी एकत्र येत कॅमेरा विकत घेतला. यासाठी ऋतुराज घोरपडे या तरुणाने त्याच्या वडिलांच्या नावाने कर्ज घेतलं होतं. लग्न अथवा विविध कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घेऊन तिघांनी एकत्रित हे कर्ज फेडण्याचं ठरलं. काही ऑर्डर्स ही मिळाल्या, पण नंतर अपेक्षित कामं मिळणं बंद झालं आणि परिणामी हफ्ते थकले.


आता यावर काय तोडगा काढायचा, याचं उत्तर तिघांनाही सापडत नव्हतं. सर्वाधिक तणाव ऋतुराज घोरपडेला आलं होतं. कारण त्याच्या हाती दुसरं काही कामही नव्हतं. शिवाय वडिलांना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न ही त्याला सतावत होता. यातून ऋतुराजने कॅमेरा विकून टाकला. मात्र तरी तो एका खाजगी कंपनीत कामाला जाणाऱ्या दुसऱ्या मित्राकडे कर्जाचा हफ्ता मागत होता. पण तू कॅमेरा विकला आहेस, तर मग आता मी पैसे का देऊ? यावरून त्या दोघांमध्ये वर्षभरापासून वाद सुरु होते. यामुळे संतापलेल्या ऋतुराजने याचा बदला घ्यायचं ठरवलं. यासाठी मध्यरात्री तो चिंचवडमधील ओम गणेश सोसायटीत आला. भिंतीवरून उडी मारत मित्राच्या गाडीजवळ पोहचला आणि त्याची गाडी पेटवून तिथून पोबारा केला.


मध्यरात्रीचे वेळ असल्याने रहिवाशी झोपले होते, सर्वांना घटना कळेपर्यंत आगीनं रौद्ररूप घेतलं होतं. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, पण तत्पूर्वीच आगीने शेजारच्या वाहनांना लपेटलं होतं. एकूण दहा वाहनं जळून खाक झाली. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळं हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलीस, अग्निशमन आणि रहिवाशांनी बांधला होता. पण सोसायटीतील सीसीटीव्ही फोटेज तपासल्यानंतर वाहनांच्या जळीतकांडाचं खरं कारण समोर आणलं. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी ऋतुराजला ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहन तोडफोड आणि जळीतकांड घटनांना घेऊन पोलिसांसमोरच उघड नाराजी व्यक्त केली होती. इतरांच्या वादात सामान्यांच्या वाहनाचे नुकसान होऊ देऊ नका अशी सूचना दिली होती. त्यानंतर ही आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांचे कर्मचारी या घटना रोखू शकलेले नाहीत. हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झालं.