पिंपरी-चिंचवड : आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्र हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी गुन्हेगारांना तंबी दिली. पण गुन्हेगारांनी या तंबीला फारसं गांभीर्याने घेतलं नसल्याचं शुक्रवारच्या घटनेने स्पष्ट झालंय. उलट शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकत असल्याचंच दृश्य समोर आलंय. शंभर जणांच्या टोळक्याने घातलेला धुडकूस सीसीटीव्हीत कैद झाला आणि कायदा सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजलेत हे चव्हाट्यावर आणलं. घडल्या प्रकाराने परिसरात चांगलीच दहशत पसरलेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नसल्याचीच चर्चा सर्वत्र रंगलीये.
शुक्रवारी रात्री एका इसमाची हत्या करण्याच्या इराद्याने शंभर जणांचं टोळकं पिंपरीच्या नेहरूनगर परिसरात आलं. पंचवीसहून अधिक दुचाकी आणि चारचाकीवरून आलेल्या टोळक्याने अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत तिथं धुडकूस सुरू झाला. फिर्यादिच्या दिशेने बोट दाखवत हाच का तो? ह्याला जिवंत सोडू नका, असा आवाज देताच एकाने तलवारीने थेट डोक्याच्या दिशेने वार केला. सुदैवाने तो फिर्यादीने चुकवला आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळू लागला, तेव्हा काहींनी त्याच्या दिशेने सिमेंटचे ब्लॉक ही फेकून मारले. ते हाताने अडवले पण काही ठिकाणी इजा ही पोहचली. पण फिर्यादी वाचल्याने हे टोळकं संतापले. मग त्यांनी तिथल्या अनेक वाहनांची तलवार, कोयते आणि सिमेंट ब्लॉकने तोडफोड केली आणि तिथून पोबारा केला. अवघ्या काही मिनिटांत घातलेला हा राडा परिसरातील नागरिकांना मोठा धक्का देणारा ठरला. हे पाहून उपस्थित नागरिक सैरभैर झाले, काही मिनिटांत सर्व दुकानं बंद झाली आणि परिसरात स्मशान शांतता झाली.
पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ही तिथं यावं लागलं. नागरिकांमधील दहशत दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. फिर्यादीकडे चौकशी केली असता हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचं समोर आलं. झालेला हल्ला आणि तोडफोड प्रकरणी पिंपरी पोलिसांनी काही टवाळखोरांना अटक ही केलीये.
गेल्या काही दिवसांतील घटना
- 28 ऑक्टोबर - बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने राडा घातला, तलवारीने बारा वाहनांची तोडफोड
- 30 ऑक्टोबर - 100 जणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयते नाचवत एकावर प्राणघातक हल्ला केला. दहा वाहनांची तोडफोड केली.
- 30 ऑक्टोबर - दहा जणांच्या टोळक्याने एका वृद्धावर जीवघेणा हल्ला करत दोन बसची तोडफोड केली
- 30 ऑक्टोबर - आठ जणांच्या टोळक्याने एकाच्या घरावर आणि वाहनांवर दगडफेक केली
कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. पण एकामागेएक अशा अनेक घटनांनी शहर हादरून निघालं. त्यामुळं आता तर शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकू लागल्याची भीती व्यक्त केली जातीये.