पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे. पुरातत्त्व खात्याने ही डागडुजी केली होती. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या भुईकोट किल्ल्याचं मूळ बांधकाम अजूनही तसंच आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वींची पुरातत्त्व खात्याने केलेली डागडुजी मात्र ढासळली आहे.

डागडुजी ढासळल्याने इतिहासप्रेमींसह सर्वच स्तरातून पुरतत्त्व खात्याच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

तिकडे पुरतत्त्व खात्याने मात्र या प्रकाराला ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितलं आहे.

शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चाल करुन आला, तेव्हा त्याने चाकणचा हा संग्रामदुर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु खानाच्या वीस हजारांच्या फौजेला फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखालील अवघ्या चारशे मराठी मावळ्यांनी या संग्राम दुर्ग किल्ल्याच्या साहाय्याने तब्ब्ल 56 दिवस झुंजवलं होतं. इतिहासात चाकणची लढाई प्रसिद्ध आहे.

काही वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या तटबंदीच्या काही भागाची डागडुजी पुरातत्त्व खात्याने केली होती. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या डागडुजीसाठी एका ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, या ठेकेदाराने काय दर्जाचं काम केलं होतं, हे तीन वर्षातच लक्षात येऊ लागले आहे.