पुणे:  पंधरा वर्षाच्या नवसाने राज्यात ‘फसणवीस सरकार’ सत्तेवर आले. ज्या सोशल मीडियाने भाजपला सत्तेवर बसविले, तोच सोशल मीडिया यांना सत्तेवरुन खाली खेचेल अशी टिका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते  धनंजय मुंडे यांनी केली.

पुण्यात तिसरा वशाटोत्सव पार पडला. यावेळी धनंजय मुंडे, ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार यांनी हजेरी लावली.

सोशल मीडियावर विविध सामाजिक विषयातून राज्यभरात अनेक तरुण-तरुणी आपली मते व्यक्त करतात. अशा तरुणांनी एकत्र येत वशाटोत्सव सुरु केला. राज्यभरात ठिकठिकाणी हा वशाटोत्सव केला जातो.

यंदा या वशाटोत्सवाचे अध्यक्ष धनंजय मुंडे होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, “येणारी  विधानसभा,लोकसभा निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लढविली जाणार असून, यामध्ये तरुणांचे योगदान महत्वाचे असेल. ज्या सोशल मीडियाने भाजपला सत्तेवर बसविले, तोच सोशल मीडिया यांना सत्तेवरुन खाली खेचेल”

जनतेने यांना सत्ता दिली पण सत्तेचे नियोजन करण्यात हे अयशस्वी झाले असं मुंडे म्हणाले.

सरकारवर वागळेंचं टीकास्त्र

"हे सरकार मीडियातही हस्तक्षेप करत आहे. आता तर बोलण्याचीही बंदी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीसुध्दा माध्यमांच्या मालकांना फोन करुन बातम्या लावयला सांगतात. हे मुख्यमंत्री लबाड असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले, अशा मुख्यमंत्र्याला लबाड नाही तर काय म्हणायचे" अशी टिका ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केली.