पुणे : एमपीएसची परीक्षा पुढे ढकल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण या आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुणे पोलीस दलातील तब्बल पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. यातील तिघे जण हे वरिष्ठ अधिकारी आहेत. आंदोलन संपल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता हे पाचही जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
एमपीएससीची पूर्व परीक्षा 21 मार्चला
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता एमपीएससीची पूर्व परीक्षा 21 मार्चला पार पडणार आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
काल नेमकं काय घडलं होतं?
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं होतं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. त्यानंतर पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होतं. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.