पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एका ट्रॅव्हल एजन्सीसोबत दुबईला फिरायला गेलेलं दाम्पत्य आणि त्यांना मुंबई एअरपोर्टवरुन पुण्याला घेऊन येणारा कार चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतरच्या एका वर्षात कोरोनाने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदललं. जिथून आणि ज्यांच्यापासून या बदलाला सुरुवात झाली त्यांची आज काय परिस्थिती आहे याचा आढावा. 


आज महाराष्ट्रात असं एक गाव नाही किंबहुना अशी एक गल्ली नाही जिथे कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु सुरुवातीच्या काळात या कोरोनाचं केंद्र होतं हे नायडू हॉस्पिटल.  परिस्थिती अशी होती की या नायडू हॉस्पिटलकडे येणाऱ्या रस्त्यावर यायलाही लोक घाबरायचे. परंतु या नायडू रुग्णालयानेच सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं काम व्यवस्थित पार पाडलं. आता एका वर्षानंतर देखील हे काम थांबलेले नाही, उलट त्यामध्ये वाढच होत आहे.


नायडू रुग्णालयात कोरोनाच्या या पहिल्या रुग्णांना दाखल करुन उपचारांना सुरुवात करण्यात आली. पुढे कोरोनाने हळूहळू सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली. पण कोरोनाचा सामना कसा करायचा, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे या नायडू हॉस्पिटलने दाखवून दिलं. आज एका वर्षानंतर यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. चाचण्या करण्यासाठी आणि उपचारांसाठी नायडूमध्ये सुरु झालेली रांग आज देखील कायम आहे . 


नऊ मार्चला आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णाला घेऊन येणारे आणि हॉस्पिटलमधील 14 दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना घरी पोहोच करणारे अॅम्ब्युलन्सच्या चालकांना पुढे काय परिस्थिती येणार आहे याची कल्पनाही नव्हती. 


पण या सगळ्यांपेक्षा आयुष्य बदललं ते पहिले कोरोना रुग्ण म्हणून ज्यांची नोंद झाली त्या कुटुंबाची. आज देखील हे कुटुंब स्वतःची ओळख जाहीर करायला कचरत आहे. खरंतर वेगवगेळ्या देशातून महाराष्ट्रात परतलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना राज्यात येऊन पोहोचला होता. परंतु काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पहिल्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. 


पुढे या एका वर्षात आपल्या सगळ्यांचंच आयुष्य कोरोनामुळे बदलून गेलं आणि पुढेही त्यामध्ये कोणत्या स्वरुपाचे बदल होतील याचा अंदाज कोणालाच येत नाही. अशावेळी या एका वर्षात आलेल्या अनुभवातून धडा घेऊन स्वतःमध्ये आणि स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं हेच शहाणपणाचं ठरणार आहे.