पुणे : पुणे महापालिकेकडून एका उद्यानाला 1991 साली सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात आलं. पण उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख साध्वी सावित्रीबाई फुले असा असल्यानं वाद निर्माण झालाय. 30 वर्षांनंतर हा वाद निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेकडून सावित्रीबाई फुलेंना हिंदुत्त्ववादी विशेषणं लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता समता दलानं केला आहे. समता दलाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या नावाच्या आधी असलेल्या साध्वी हा उल्लेख झाकून टाकला आहे. पुण्यातल्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ हे उद्यान आहे.
1991 ला कॉंग्रेस सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या उद्यानाची कोनशीला बसवल्याची पाटी देखील आहे. पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेने या उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केला आहे. यामुळं चांगलाच वाद पेटला आहे.
Pune : साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख का केला? समता दलाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप ABP Majha
पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचं म्हणणं आहे की, आम्हाला जसे वरुन आदेश आले त्याप्रमाणं आम्ही बोर्ड लावला आहे. या पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा आहे. असं ना देऊन सावित्रीबाई फुले यांचं दैवतीकरण करण्याचा पुणे महापालिकेचा प्रयत्न आहे, असा आरोप समता दल आणि काही अन्य संघटनांनी केला आहे. सावित्रीबाईंच्या नावाअगोदर क्रांतिज्योती विशेषण लावावे अशी मागणी समता सैनिक दलाने केली आहे. तसेच महापालिकेने उद्यानाच्या नावात त्वरित बदल केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील समता सैनिक दलाने दिला आहे.
यावर रिपाई खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटलं आहे की, भाजपनं हे लक्षात ठेवावं की सावित्रीबाई फुले या विज्ञानवादी होत्या. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात स्त्री शिक्षणासाठी मोठे काम केले आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो तसेच आमचं महापौरांना म्हणणं आहे की हा उल्लेख असलेली पाटी तात्काळ हटवावी अन्यथा आम्ही महापालिकेच्या विरोधात आंदोलन करु, असं सचिन खरात यांनी म्हटलं आहे.