मुंबई : 10 मीटरच्या ट्विन टनेलच्या बोगद्यांचे एकत्रित 634 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावर सध्या दोन बोगदे आणि दोन पुलांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे मुंबई-पुणे प्रवासातील अंतर 6 किमीने कमी होणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. मिसिंग लिंक या नावाने ओळखला जाणार्‍या या मार्गावरील मुंबईच्या दिशेने 540 मीटरचा बोगदा पूर्ण झाला आहे. तर पुण्याच्या दिशेने जाणारा 94 मीटरच्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.


पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. एमएसआरडीसीने यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंकचे नियोजन केले आहे. चार पदरी असणारा हा बोगदा साधारणपणे 24 मीटर रुंद असून आपातकालिन स्थितीत रस्त्याच्या कडेला वाहनांची दुरुस्ती करता येईल, अशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली आहे. खंडाळा घाटातील बहुंताश दगड हा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला असल्याने तो फोडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही अपघाताशिवाय बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. बोगदा तयार करत असतानाच सिमेंटीकरणाचे कामही सुरू असल्याने दगड सुटून अपघात होण्याच्या घटनांना पायबंद घालण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे 200 कर्मचारी आणि अभियंते सतत काम करत असल्याने, कुठल्याही स्वरुपाचा धोका नसल्याचीही माहितीही त्यांनी दिली. कामाचा वेग विचारात घेता, नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल असा विश्वास अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये मिसिंग लिंकचे कंत्राट ऍफकॉन इन्फ्रास्टक्चर आणि हैदराबादस्थित नवयुगा इंजिनियरिंग कंपनीला 6 हजार 695 कोटींचे कंत्राट तीन वर्षासाठी देण्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. या बोगद्यातील अंतर्गत अग्निसुरक्षेवर सुमारे 130 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.यात स्मिंकलर्स आणि स्मोक डिटेक्टर्स अलार्मचा समावेश आहे. या मिसिंग लिंकच्या कामासाठी परिसरातील सुमारे 5 हजार झाडांवर कुर्‍हाड चालविली जाणार आहे पण त्या बदल्यात एमएसआरडीसीतर्फे एक्सप्रेसवेच्या दुतर्फा सुमारे 40 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.