पिंपरी चिंचवड : "अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासात होण्याची शक्यता असताना, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी चिंचवडचे आमदार आहेत.

80 तासांचं सरकार स्थापन झाले तेव्हा अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार अजित पवार यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते. त्या 80 तासात पवार कुटुंबीयांकडून काय शिकायला मिळालं असा प्रश्न विचारला असता त्यांनी याला बगल दिली. मात्र महाविकासआघाडीत अजित पवारांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार, याला उत्तर देताना अजित दादा हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्ता स्थापन केली. या शपथविधीवेळी अण्णा बनसोडे हे एकमेव आमदार शेवटपर्यंत अजित पवारांसोबत होते. हे सरकार केवळ 80 तासच टिकलं. अजित पवारांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र आता अण्णा बनसोडे यांनी अजित पवारच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रीमंडळ विस्तार उद्या दुपारनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला होता. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या सहा मंत्र्यांकडे हिवाळी अधिवेशनासाठी विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र या वर्षअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या 7 ते 8 जणांची वर्णी लागू शकते.