Pune Crime News: पुण्याच्या तळेगाव (Pune) येथे सीआरपीएफ (CRPF) वायरलेस विभागातील जवानाने गळफास (Pune Crime) घेऊन आत्महत्या केली आहे. अमरेशकुमार गिरी (Amreshkumar Giri) असं आत्महत्या केलेल्या जवानाच नाव आहे. अमरेश हे नुकतेच सुट्टीवरुन आले होते, काल मंगळवारी (20 सप्टेंबर) कर्तव्यावर हजर झाले होते. वायरलेस विभागाच्या स्टोअर रुममध्ये जाऊन त्यांनी केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाही.
अमरेशकुमार गिरी असे मृताचे नाव आहे. मृत हा मूळचा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील आहे, असं पिंपरी चिंचवड हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे. गिरी हे पुणे शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ कॅम्पसच्या वायरलेस कम्युनिकेशन युनिटमध्ये तैनात होते.
गिरी सोमवारी रजेवरून परतले होते आणि मंगळवारी त्यांना दुपारची ड्युटी देण्यात आली होती. सकाळी 10.15 च्या सुमारास ते कॅम्पसमधील स्टोअर रुममध्ये मृतावस्थेत आढळले. प्राथमिक तपासात आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. आम्ही या घटनेपर्यंतच्या घटनाक्रमाचा तपास सुरु केला आहे, असं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत प्राथमिक तपासणीत कोणतीही नोंद सापडलेली नाही. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या आत्महत्येत वाढ?
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुनील शिंदे असं 48 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होतं. शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती मध्ये राहायला होते. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले मात्र सकाळपासून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. मुलाने वडील आवाज देऊन सुद्धा दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला लटकून गळफास घेतल्याचे मुलाला निदर्शनास आलं होतं. याबाबत त्यांच्या कुटुंबियाकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांच्या सुनेने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्या प्रकरणी काल न्यायालयात तारीख होती. यात त्यांच्या मनाप्रमाणे चर्चा फ्रेम झाला नव्हता. या सगळ्याचं त्यांनी टेन्शन घेतलं. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांनी दिली होती.