Pune Crime News: पुण्यात पीएमपीएमएल (PMPML) बसच्या कंडक्टरने तरुणीला (Pune Crime News) धक्काबुक्की करत तिचे केस ओढून बसमधून खाली उतरवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे या परिसरात ही घटना घडली आहे. सगळीकडे कंडक्टरच्या या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक चेतना केरुर तसेच जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांच्याकडे तक्रार करुन संबंधित वाहकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
22 वर्षीय तरुणी रोज प्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी बसमध्ये गर्दी असल्याने तरुणीने बसच्या मध्य भागात उभं राहण्यासाठी जात असताना कंडक्टरला बाजूला सरकण्याची विनंती केली. त्यावेळी कंडक्टरने उद्धटपणे त्या तरुणीला उत्तर दिलं. 'मी काय आता खाली उतरु का' या भाषेत उत्तर देत कंडक्टर संतापला. यात वादात दोघांचा वाद झाला. अरेरावी करण्यास सुरुवात झाली. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. बसमध्ये त्रास होत असेल तर बसमधून खाली उतरण्यास सांगितलं. त्यावेळी तरुणीने सगळ्यांसमोर कंडक्टरला वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.
धमकी देत कंडक्टरचा फोटो काढला
संबंधित तरुणीचा हा केलेला अपमान तिला सहन झाला नाही त्यावेळी तरुणीने तक्रार करेन, अशी धमकी दिली आणि गर्दीत कंडक्टरचा फोटो काढला. त्यामुळे कंडक्टर पुन्हा संतापले. त्यांनी बस थांबायला लावून तरुणीच्या पाठीवरची बॅग ओढली. तिला धक्काबुक्की केली आणि तिचे केसही ओढले. अपमानास्पद पद्धतीने तरुणीला बसमधून उतरवलं आणि बस पुढे नेण्यास सांगितली.
बाकी प्रवाशांची बघ्याची भूमिका
या बसमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होती. त्याच ठिकाणी हा प्रकार घडत होता. तरुणीला धक्काबुक्की केल्या जात होती. बसमधील अनेक लोक तरुणीला मदत करु शकली असती मात्र त्यांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली होती. हा कंडक्टर बाकी प्रवाशांना देखील उद्धट वागणूक देत होता. मात्र अनेक नागरिकांनी त्याच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केलं.
कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी
पीएमपीएमएल बसने रोज शेकडो लोक प्रवास करत असतात. त्यात महाविद्यालयीन तरुणींचा समावेश जास्त असतो. पुणेकर बिनधास्त यात प्रवास करतात मात्र कंडक्टर यांच्या वागण्यामुळे पीएमपीएमएलची प्रतिमा मलीन होते, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे प्रतिमा मलीन करणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तरुणीसह इतरांनी केली आहे.