Maharashtra Agriculture news : सध्या राज्यात विविध भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळं शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे कुरन सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


सोनोरी गावातील 90 टक्के शेतकऱ्यांच्या अंजीर आणि सीताफळाचे नुकसान


पुरंदर तालुक्यातील सोनोरी हे गाव अंजिराचे आणि सिताफळाचे आगार म्हणून ओळखलं जातं. पंरतू, या गावातील शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पडत असलेल्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. त्यामुळे गावातील 90 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकरी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळं अंजीर पिकांवर तांबेरा, लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं  यावेळचा अंजीर सिझन वाया गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. अशोक काळे आणि हिरामण काळे यांनी दीड एकरावर अंजिराची बाग लावली आहे. परंतू, त्यांची 90 टक्के बाग रोगाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. मोठ नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.




औषध फवारणी करुनही बाग वाया गेली


सध्या अंजीर पिकाची जी अवस्था आहे तिच अवस्था सीताफळाची आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं सीताफळ काळे पडले आहेत. औषध फवारणी करुन देखील बाग हातातून निसटून गेली आहे. सीताफळ खाली पडून लागली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. अंजीरावर एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो.  तर सीताफळ पिकांवर 60 ते 70 हजार रुपयां एकरी खर्च होतो. तांबेरामुळे अंजिराची पानगळ होत आहे. तसेच फळ खराब होत आहे. बागेची मोठी पानगळ झाली आहे. त्यामुळे जी फळ शिल्लक आहेत, ती नीट येऊन बागेत झालेला खर्च निघावा, यासाठी सध्या औषध फवारणी करीत आहेत. सध्या जरी झाडाला फळ दिसत असले तरी तांबेरामुळं अंजीर काळे पडून खराब होत आहे. परंतू जर पाऊस पडला नाही तर खर्च निघू शकतो असं सारिका काळे यांनी सांगितले.




सोनोरी गावातील 1 हजार हेक्टरवरील अंजीराच्या बागेचं नुकसान, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी
 
अंजीर पिकातून शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. परंतू, रोगाला बळी पडल्यानं त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं सरकारकनं पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोनोरी गावाची ओळख ही पुरंदर तालुक्यातील अंजीराचे आगार म्हणून आहे. पावसामुळं या गावातील 1 हजार हेक्टरवरील बागेचे नुकसान झाल्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य रामभाऊ काळे यांनी सांगितले. सोनोरी गावात 700 कुटुंब आहेत. गावात प्रत्येकाडे अंजीराची बाग आहे. सर्वांच्या बागेचं नुकसान झालं आहे. गावातील 90 टक्के बागांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील वसूल होणार नाही.  शासनानं पंचनामे करुन तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं बागेचे नुकसान झालं आहे. अंजीर आणि सीताफळीची बाग रोगाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. झालेला खर्च निघण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करत आहेत. शेतकऱ्यांची बाग वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शेतकरी सरकार दरबारी मदत मागत आहेत. त्यामुळं आता सरकार या अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत, फळांवर काळे डाग