Pune BRT News : पुण्यात (Pune) वाहतूक कोंडीवरुन लेटरवॉर सुरुच आहे. पीएमपीएमएल आयुक्तांनी बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी बीआरटी मार्ग बंद करा, अस पत्र पालिकेला दिले होते, या पत्राला पीएमपीएमलने विरोध केला आहे. प्रवाशांना जलद वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलेले कोणतेही बीआरटी मार्ग (BRT Route) बंद करु नयेत, अशी मागणी पीएमपीएमएलने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी विविध मार्ग सुचवले होते. त्यात बीआरटी मार्ग बंद करण्याचं पत्र महापालिकेला दिलं होतं. त्यानुसार बीआरटी मार्ग बंद करण्यात येणार होते. मात्र या निर्णयाला पीएमपीएमएलने विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. बीआरटीमुळे पीएमपीएमएलचं संचलन योग्यरित्या होतं. त्यांच्या वाऱ्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाही त्यामुळे बीआरटी बंद करु नका, असं त्या पत्रात नमूद केलं आहे.
बसेसच्या आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यासाठी शहरातील काही मार्गावर फक्त बीआरटी बस मार्ग सुरु करण्यात आले. असून त्यासाठी रस्त्यातील मध्य भागातून स्वतंत्र असा रस्ता पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमार्फत तयार करण्यात आलेला आहे. या बीआरटी बस मार्गावर परिवहन महामंडळामार्फत शहराच्या विविध भागाकडे प्रवाशांना येण्या-जाण्यास सोयीचे होण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवास होण्याकरता बसेसचे संचलन सुरु ठेण्यात आलेले आहे.
नगर रोड येरवडा ते वाघोली, संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि सातारा रोड कात्रज ते स्वारगेट तीन बीआरटी मार्ग आहेत. बीआरटी मार्गावर अनेक बसचं संचलन सुरु असतं. या बसचं वेळापत्रक देखील आहेत. प्रवाशांना चढ उतार करण्यासाठी बस थांबते. अशा परिस्थितीमध्ये इंडस्ट्री बसेस किंवा खाजगी वाहनांना बीआरटी मार्गातून संचलनासाठी प्रवेश दिल्यास पीएमपीएमएलच्या बसेस संचलनास अडथळा निर्माण होऊन बसेसचे वेळापत्रकाप्रमाणे वारंवारीता राहणार नाही, असं पीएमपीएमएलचं म्हणणं आहे.
अॅम्बुलन्स, पोलीस वाहने, स्कूल बसेस आणि राज्यपरिवहन महामंडळाकडील बसेस यांना बीआरटी मार्गामधून परवानगी देण्यास हरकत नाही. मात्र बीआरटी मार्गामध्ये अडथळा निर्माण होणाऱ्या इंडस्ट्री बसेस किंवा खाजगी वाहनांना बीआरटी मार्गाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.