पुणे : सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.


नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. 2014  व 2019 मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे.


महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी.


भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले.


जाहीरनाम्यात आपल्या जुन्या योजनांचा विस्तार केला?


भाजपने आपल्या या जाहीरनाम्यात आपल्या जुन्या योजनांचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. महिला, तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. देशाची अर्थव्यवस्था कशी वाढेल, यावरही आम्ही काम करू, असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे मोदी सत्तेत आल्यास या आश्वासनांची अंमलबजावणी होणार का? भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Rupali Chakankar On Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्यव्यावर रुपाली चाकणकर भडकल्या; म्हणाल्या सुनांना...