पुणे:  काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधील आपला राजीनामा (Sangram Thopate Resignation to Congress) दिला त्यानंतर आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज त्यांनी कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली, त्याचबरोबर त्यांनी आज आपला पुढचा निर्णय जाहीर केला आहे. ते लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब करत दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 22 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. या प्रवेश कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. मुंबईमधील भाजपच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे

संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलताना सांगितलं की, "काँग्रेस सोडताना मनात दुःख आहे, पण ही वेळ पक्षानेच आणली आहे. पक्षाने मला संधीच दिली नाही. अनेक वेळा मला डावलण्यात आलं. कार्याध्यक्षपद दिलं नाही, विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. राजकीय दृष्टिकोनातून पक्ष ताकद देत नव्हता, म्हणूनच मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की, भाजपमध्येच आपल्याला न्याय मिळू शकेल, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ काँगेसने आणली

दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, भाजपमध्ये जावं अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. येणाऱ्या 22 तारखेला पक्ष प्रवेश होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होईल. माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ काँगेसने आणली. 3 वेळा निवडून आलो, 2019 ला वाटत नव्हतं सत्ता येईल काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळाली. पुण्याला  मंत्रीपद मिळेल त्यात मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण मंत्रिपद मिळालं नाही. पटोले यांनी राजीनामा दिला त्यावेळी विधानसभा अध्यक्ष पद मिळेल वाटलं पण तिथे ही संधी मिळाली नाही. विरोधी पक्षनेते पद मिळेल वाटलं पण तेव्हा पण मिळाले नाही. पक्ष सोडताना दुःख होतंय. पण विकासासाठी निर्णय घेतोय. मी दबावाला बळी पडलो नाही. पक्ष आदेश नेहमी पाळला असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

मी पडल्यावर पण मला फोन केला नाही

सलग तीन वेळा निवडून आलो, पण मला ताकद द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात जर ताकद दिली असती तर विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळं पाहायला मिळाले असते. मला पक्ष प्रवेश करताना कोणतंही आश्वासन दिले नाही. मी कोणत्याही पदासाठी गेलो नाही. 2019 पासून नाराजीला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात वजन वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. फॉर्म भरायला पक्षश्रेष्ठींना बोलावलं, कुणी वेळ दिला नाही. मी पडल्यावर पण मला फोन केला नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये आश्वासक चेहरा नाही.अनेक प्रकल्प आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. अनेकदा कात्री लागली. सत्ता असताना काही कामे झाली नाहीत. मुळशी तालुक्यात लोकसभेला मतदान झालं ते विधानसभाला मला झालं नाही. ताईंनी माझं काम केलं पण कार्यकर्त्यांनी कामे केले नाही. काहींनी काम केलं नाही. पण आकडा बोलतो आहे, काम झालं नाही. मी अमित शाह यांच्याशी बोललो. एनसीडीसी (NCDC) तून कर्ज मिळावे यासाठी मी त्यांना बोललो असल्याचं थोपटेंनी सांगितलं आहे.

22 एप्रिलला होणार भाजप प्रवेश

थोपटे यांचा भाजप प्रवेश २२ एप्रिलला मुंबईत पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.

थोपटे यांनी काँग्रेस नेतृत्वावर थेट टीका

राजीनाम्यानंतर थोपटे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत, "मी पक्षासाठी काम केलं, पण पक्षाने मला झुकतं माप दिलं नाही. संधी नाकारण्यात आली. त्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी भाजप हाच पर्याय योग्य वाटतो आहे", असं स्पष्ट केलं आहे.