पुणे: पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.


पिंपरीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निळू फुले नाट्यगृहाचं उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने हे उद्घाटन उरकून घेतलं.

हे नाट्यगृह आपण उभारल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्याचं श्रेय भाजपला का असा सवाल करत, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या आधीच उद्घाटन उरकलं. शिवाय या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना आमंत्रित न केल्यानेही राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपळेगुरव इथं नटसम्राट निळू फुले नाट्यगृह बांधलं आहे. मुख्यमंत्री दुपारी साडे तीन वाजता या नाट्यग्रहाचे भोसरीतून ‘ई’ उदघाटन करणार आहेत.

मात्र राष्ट्रवादीने त्यापूर्वीच शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते उद्‌घाटन केलं.

हे नाट्यगृह भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यात पिंपळेगुरव इथं आहे.