पुणे : पुण्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयकार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डशी जोडण्यात आले आहेत. म्हणजेच आयकार्डच या विद्यार्थ्यांसाठी डेबिट कार्ड असेल आणि हेच डेबिट कार्ड त्या विद्यार्थ्यांचं आय कार्ड असेल. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.


सध्या ‘डिजिटल मनी’चं युग आहे. वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, एटीएम कार्ड हे वापरणं नित्याचेच झाले आहे. मात्र या डेबिट कार्डचा उपयोग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं ओळखपत्र म्हणून देखील होऊ शकतो का, असा प्रश्न पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सतावत होता. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहार आणि त्यांचे ओळखपत्र एकत्र करता येऊ शकते का, यासाठी प्रयत्न सुरु झाले आणि त्याला यश देखील मिळाले.

महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागात हे ओळखपत्र उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर स्टेट बँकेसह इतर अन्य बँकेच्या एटीएम म्हणून देखील हे स्मार्ट कार्ड वापरले जाणार आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक विभागांसाठी वेगवेगळी ओळखपत्रे विद्यार्थ्यांना जवळ बाळगावी लागतात. ग्रंथालय, प्रयोगशाळा, वसतिगृह अशी अनेक विभाग यामध्ये येतात. मात्र एवढी सारी ओळखपत्रे जवळ बाळगणे हे विद्यार्थ्यांना अडचणीचे असायचे. त्याचबरोबर या सर्व विभागांनादेखील याची जबाबदारी पेलायला लागायची. मात्र आता या स्मार्ट कार्डमुळे सर्वांचाच त्रास कमी होणार आहे. या स्मार्ट कार्डमध्ये विद्यार्थ्याचा सर्व शैक्षणिक डेटा साठवण्यात आला आहे.

गेल्या वर्षापासून COEP आणि SBI या संकल्पनेवर काम करत होते. SBI ने आपले डेबिट कार्ड तयार करुन COEP कॉलेजकडे दिली आणी कॅलेजने या कार्डमधे आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा भरण्यास सुरुवात केली.

पहिल्या टप्प्यात या महाविद्याल्यातील 1200 विद्यार्थीना हे कार्ड देण्यात आले आहे. पुण्याच्या या COEP कॉलेजने आतापर्यंत असे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत.