CM Eknath Shinde On Shiv Sena :  शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 


मुख्यमंत्री शिंदे हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झाला आहे.  त्यावर आक्षेप घेणे चूक असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही शिवसेना आहोत.  त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले.  मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही.  आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर आता शिवसेना भवन आणि शाखांसाठी होणारे वाद थांबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाच्या ताब्यात स्थानिक पातळीवरील शिवसेना शाखा जाऊ नये यासाठी ठाकरे गटानेही कंबर कसली होती. संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. 


कसबा हा युतीचा बालेकिल्ला (Kasaba bypoll)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कसबा पेठेतील अनेक समाजाचे लोक मला येऊन भेटले. तेली समाज, मराठा समाज, सोनार समाज , ब्राम्हण  समाज असे अनेक समाजाचे लोक येऊन भेटले. कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. भाजपवर ब्राह्मण समाज नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले. नाराजी असल्याचे विरोधकांकडून हे पसरवलं जात असून हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे, असेही त्यांनी म्हटले. मतदार ठरवत असतात की कोणाला जिंकवायचे. युती सरकार ज्या धडाडीने निर्णय घेतय त्यामुळे हे सरकार काम करत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: