पिंपरी-चिंचवड : आम्ही कुठल्या पक्षाविरोधात नाही. मोदींना साथ दिली तर मित्रपक्षांचे खासदार निवडून आणू, पण मोदींना साथ दिली नाही तर आमचे खासदार दिल्लीला पाठवू, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता इशारा दिला आहे.


पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात अटल संकल्प महासंमेलनाच्या माध्यमातून भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघात  शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. पिंपरी चिंचवडच्या मदनलाल धिंग्रा मैदानावर भाजपकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.


शिवसेना भाजपच्या युतीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "भाजपची ही सभा होत असताना लोक आम्हाला विचारत आहेत की, आता तुमची शिवसेनेसोबतची युती संपली का? मी सांगू इच्छितो की ही सभा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. जर त्यांनी (शिवसेनेने) नरेंद्र मोदींना साथ दिली तर मित्रपक्षाचे खासदारही याठिकाणाहून निवडून दिल्लीला पाठवू. मात्र त्यांना जर मोदींना साथ दिली नाही तर आम्ही मोदींचे हात बळकट करण्यासाठी आमचे खासदार दिल्लीला पाठवू."


या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती होती. या सभेत आमदार बाळा भेगडे, आमदार सुरेश हळदणकर, आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळ आणि शिरुरमधून स्वबळावर लढण्याची मागणी केली.