अनैतिक संबंधांत अडथळा, मुलाची हत्या करणाऱ्या आईला 10 वर्ष सक्तमजुरी
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2018 11:58 PM (IST)
पुण्यातील टिंगरे नगरमध्ये राहणाऱ्या राखी बालपांडेने ऑगस्ट 2015 मध्ये 13 वर्षांचा मुलगा चैतन्यची बॅटने मारहाण करुन हत्या केली होती
NEXT PREV
पुणे : अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरल्याने पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या पुण्यातील वैरिणी मातेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राखी बालपांडेला पुणे सत्र न्यायालयाने आज शिक्षा ठोठावली. पुण्यातील टिंगरे नगरमध्ये राहणाऱ्या राखी बालपांडेने ऑगस्ट 2015 मध्ये 13 वर्षांचा मुलगा चैतन्यची बॅटने मारहाण करुन हत्या केली होती. जिन्यावरुन पडल्यामुळे चैतन्य जखमी झाल्याचा बनाव तिने रचला होता. मात्र पोलिस तपासात राखीनेच चैतन्यचा जीव घेतल्याचं उघडकीस आलं होतं. मूळची नागपूरची असलेली राखी बालपांडे नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे मुलगा चैतन्यसोबत पुण्यात राहत होती. एका खाजगी कंपनीत ती एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती. पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी तिनं अर्जही दाखल केला होता. टिंगरे नगरमध्ये ती रहात असलेल्या फ्लॅटमालकाचा मुलगा सुमित मोरेसोबत तिचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्या संबंधांना चैतन्यचा अडसर येत असल्याने तिने लेकाचाच काटा काढला. न्यायालयात राखी बालपांडेवरचे आरोप सिद्ध झाल्याने तिला दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, मात्र सुमित मोरेची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली.