पुणे : नाना फडणवीसांच्या वाड्यात 1857 च्या युद्धाचा इतिहास दडलेला आहे. हा वाडा म्हणजे इतिहासाचे चालते बोलते पुस्तकच आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नाना फडणवीस यांच्या पुण्यातील वाड्याचे पुणे महापालिकेने सुशोभिकरण आणि डागडुजी केली आहे. आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. अशा वास्तू टिकविणे, इतरांना त्या वास्तूंचे महत्त्व पटवून देणे ही आपली जबाबदारी आहे. नानावाडा हा अशा वास्तूंपैकी एक आहे. हा वाडा म्हणजे इतिहासाचे प्रतीक आहे. फडणवीस म्हणाले की, नानावाड्यातील अकरा खोल्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडी आणि क्रांतिकारकाचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला आहे. या माध्यमातून पुढील पिढीला इतिहासाच्या घडामोडींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. ही वास्तू येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. पुणे महापालिकेच्यावतीने ऐतिहासिक नानावाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या वाड्यातील तळमजल्यावरील अकरा खोल्यांमध्ये स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट कार्यक्रमास उपस्थित होते.