पुणे : पुण्यातील संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यांचा बोलवता धनी शोधून काढू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला आहे. वडगाव शेरीत टॉय ट्रेनच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली.


शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र काही जणांना ते दोघेही समजलेच नाहीत, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाजी हे जाती-धर्मापलिकडचे देव आहेत, मात्र काही जण त्यांना संकुचित विचारांनी एखाद्या जाती-धर्मात बांधून ठेवतात, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

सामान्य माणूस नोटाबंदीचा त्रास सहन करतो, पण काही लोकांना फार त्रास होतो, त्यांना माझा सवाल आहे की 'तुमचं समर्थन भ्रष्टाचाराला आहे की भ्रष्टाचार मुक्तीला?' एकदा तुमची भूमिका स्पष्ट करा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैसे आले. कर्ज कमी होत आहे. काळ्या पैसेवाल्यांच्या नोटांची रद्दी होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं? असा बोचरा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

पुण्यात मेट्रो, पुरंदर विमानतळ येत आहे, पुणे आणि नाशिकच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.