पुणे: ‘शेतकऱ्यांची थट्टा करणारे हवामान खाते बंद करा.’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं राज्यात दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजाही चिंतेत पडला आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सतत चुकत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला पाऊस येत्या काही दिवसात सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करुन हवामान खातं शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी केला आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला गायब झालेला पाऊस 12 तारखेपर्यंत पुन्हा सक्रीय होईल असं भाकित हवामान खात्यानं केलं होतं. त्यानंतरही पाऊस आला नाही. तर पुन्हा 72 तासात सक्रीय होण्याचा अंदाज वर्तवला.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पेरण्या न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे अशा संदिग्ध अंदाजांचा काय उपयोग? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विचारला आहे.